शिर्डीच्या साई मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त

    03-May-2025
Total Views |
 
Shirdi Sai temple
 (Image Source : Internet)
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अलीकडेच घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, शिर्डीतील (Shirdi) प्रसिद्ध साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने प्रशासनात एकच खळबळ माजली आहे. ही धमकी साई संस्थानच्या अधिकृत ईमेलवर आली असून, त्यामध्ये पाइपबॉम्बने मंदिर उडवण्याचा उल्लेख आहे.
 
धमकीचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी तात्काळ साई मंदिर परिसराची पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने कठोर उपाययोजना केल्या आहेत. ही धमकी प्रत्यक्ष धोका दर्शवणारी आहे की कुणाचा केवळ खोडसाळपणा, हे शोधण्यासाठी तपास सुरू आहे. पोलिसांनी अद्याप यावर अधिकृत भाष्य केलेले नाही.
 
दरम्यान, २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांसह २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण देशात तीव्र संताप पसरला आहे, आणि पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
 
विशेष बाब म्हणजे, केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी नुकतेच शिर्डीमध्ये साईसमाधीचे दर्शन घेतले होते. त्या वेळी त्यांनी पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत पाकिस्तानला उत्तर दिले जाईल, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यांच्या या दौऱ्यानंतर काही तासांतच ही धमकी समोर आल्याने, वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
 
तसेच, ६ मे रोजी जामखेड तालुक्यातील चौंडी येथे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा फोकस ग्रामीण भागात असताना, शिर्डीतील या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणांचे आव्हान अधिक वाढले आहे.