(Image Source : Internet)
मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी स्वतः एक्स या समाजमाध्यमावरून याबाबत माहिती दिली असून, धमकी देणाऱ्याचा मोबाईल क्रमांकही पोस्ट केला आहे.
शुक्रवारी दुपारी व्हॉट्सॲपवर त्यांना एक संदेश प्राप्त झाला. त्या संदेशामध्ये अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली होती. याशिवाय, त्यांना ठार मारण्याची धमकीही देण्यात आली आहे, असा दावा आव्हाड यांनी केला.
ही बाब त्यांनी ठाणे पोलीस आणि महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक (DGP) यांना समाजमाध्यमावरून कळवली आहे. त्यांनी संबंधित मोबाईल क्रमांकाचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.
हे पहिले प्रकरण नाही. याआधीही आव्हाड यांना अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या आहेत. गेल्या वर्षी त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी असताना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. त्या व्यक्तीने आपली ओळख रोहित गोडारा अशी सांगत बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा केला होता.
त्यावेळी त्यांच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. रक्कम न दिल्यास "सलमान खानसारखे तुझे होईल" अशी धमकीही देण्यात आली होती. यासंदर्भात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा मिळालेल्या धमकीनंतर पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.