पंकजा मुंडेंना "तो" पाठवत होता अश्लील मेसेज; सायबर पोलिसांची तातडीची कारवाई, आरोपी अटकेत!

    02-May-2025
Total Views |
 
Pankaja Munde
 (Image Source : Internet)
मुंबई:
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना अश्लील मेसेज आणि त्रासदायक कॉल करणाऱ्या एका तरुणाला महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अमोल काळे (वय २५) असे आरोपीचे नाव असून तो सध्या पुण्यात राहतो, तर मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. या प्रकारामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
 
तक्रार, तपास आणि आरोपीची अटक-
मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजप कार्यालयात सोशल मीडिया समन्वयक म्हणून कार्यरत असलेल्या निखिल भामरे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७८ आणि ७९ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला.
 
सायबर पोलिसांनी अमोल काळे याने वापरलेल्या मोबाइल नंबरचा माग काढत त्याचे लोकेशन ट्रेस केले. तपासादरम्यान आरोपी पुण्यातील भोसरी भागात असल्याचे निष्पन्न झाले. तत्काळ कारवाई करत सायबर पोलिसांनी भोसरी पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली.
 
गुन्ह्यामागचा हेतू काय?
चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांकडून त्याला बीएनएस कायद्यानुसार नोटीस देण्यात आली असून अधिक तपासासाठी मुंबईत आणण्यात आले आहे. सध्या पोलिस आरोपीच्या मानसिकतेचा, हेतूचा आणि सोशल मीडिया व्यवहारांचा सखोल तपास करत आहेत.
 
गंभीर सायबर गुन्हा – राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
अश्लील मेसेजेस आणि कॉल्स ही केवळ वैयक्तिक समस्या नाही, तर राजकीय आणि सामाजिकदृष्ट्याही अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळे सार्वजनिक व्यक्तिमत्त्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, अशा गुन्ह्यांकडे शून्य सहनशीलतेच्या धोरणानुसार पाहिले जात आहे. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, प्रसिद्ध व्यक्तींना लक्ष्य करण्याचे प्रकार चिंतेची बाब ठरत आहेत. पंकजा मुंडे यांना लक्ष्य केल्याचा प्रकारही त्याचाच भाग असून, आरोपीवर कडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.