(Image Source : Internet)
अमरावती :
केंद्र सरकारने घेतलेल्या जातनिहाय जनगणनेच्या (Caste wise census) निर्णयामुळे समाजातील प्रत्येक घटकाचे प्रतिनिधित्व स्पष्ट होणार असून, यामुळे मागासवर्गीयांसह सर्वच घटकांना न्याय मिळेल, असे प्रतिपादन पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. या जनगणनेतून मिळणाऱ्या आकडेवारीच्या आधारे विविध समाजघटकांसाठी विकासात्मक योजना आखता येतील, असेही ते म्हणाले.
वरुड तहसील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार सुधाकर कोहळे, उमेश यावलकर, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. 'लाईव्ह सातबारा' अभियानाद्वारे केवळ जिवंत शेतकऱ्यांचे नाव असलेले सातबारा त्यांच्या दारात दिले जात आहेत. पांदन रस्त्याचा प्रश्नही निकाली काढला जात असून, धरणांचे बांधकाम करताना निघणाऱ्या गौण खनिजांचा उपयोग या रस्त्यांसाठी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना १२ तास अखंड वीज दिली जात आहे.
सरकारी सेवा आणि योजना नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचाव्यात यासाठी 'महाराजस्व अभियान' राबवले जात असून, प्रत्येक नागरिकाने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.
सरकारी सुविधांमध्ये अडचण आल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. या कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे अपघात सहाय्यता अनुदान, मतदार ओळखपत्र वाटप, पीएम किसान सन्मान निधीचे वाटप, ट्रॅक्टर वाटप इत्यादी उपक्रम पार पडले.आमदार उमेश यावलकर आणि खासदार डॉ. अनिल बोंडे यांनीही यावेळी आपले विचार मांडले.