IND VS PAK: भारताच्या एका धोरणात्मक निर्णयामुळे पाकिस्तानला उपासमारीचा धोका!

    10-May-2025
Total Views |
 
IND VS PAK
 (Image Source : Internet)
मुंबई:
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या लष्करी कारवाईपेक्षा पाकिस्तानला जास्त भीती भारताच्या 'नॉन-मिलिटरी' पावलांची वाट पाहत आहे. विशेषतः सिंधू नदीच्या पाण्याबाबत भारताने घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तानची अन्न सुरक्षाच धोक्यात आली आहे.
 
चिनाब नदीच्या पाण्याचा तुटवडा – खरीप हंगाम संकटात-
5 मे रोजी चिनाब नदीचा प्रवाह नेहमीपेक्षा निम्म्यापर्यंत खाली आला होता. पाकिस्तानच्या IRSA (सिंधू नदी प्रणाली प्राधिकरण) ने चिंता व्यक्त करत सांगितलं की भारताने अचानक पाणीपुरवठा कमी केल्यामुळे मारला भागात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम खरीप हंगामावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे IRSA ने जलाशयांचा एकत्रित वापर करत 21% पाणी कपात जाहीर केली आहे.
 
भारताने सोडलं मोठं पाणी – पूराचा धोका
जिथे 5 मे रोजी चिनाबमध्ये 12,967 क्यूसेक प्रवाह होता, तिथे 8 मे रोजी भारताने अचानक मोठं पाणी सोडलं आणि प्रवाह 26,363 क्यूसेकपर्यंत गेला. या अचानक वाढलेल्या प्रवाहामुळे पाकिस्तानात पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे.
 
धान व कापसावर परिणाम – निर्यात धोक्यात
पाकिस्तानचा खरीप हंगाम प्रामुख्याने धान आणि कापूस या पिकांवर अवलंबून आहे. या पिकांचे उत्पादन निसर्गावर आणि विशेषतः चिनाब नदीवर अवलंबून असते. याच उत्पादनांवर पाकिस्तानच्या निर्यातीचा मोठा हिस्सा आधारित आहे. 2023-24 मध्ये एकट्या धान्य व कापसावर आधारित वस्त्र निर्यातीमधून पाकिस्तानला 63% परकीय चलन मिळालं होतं.
 
पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला दुहेरी फटका-
सध्या पाकिस्तान आधीच आर्थिक तणावाखाली आहे. देशाचं एकूण निर्यात उत्पन्न 2023-24 मध्ये घसरून केवळ 23 अब्ज डॉलरवर आलं आहे. या संकटात भर टाकणारा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे भारतीय नौसेनेची अरबी समुद्रातील हालचाल, विशेषतः कराची बंदरजवळची उपस्थिती. यामुळे व्यापार मार्गांवर अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
शेती, निर्यात आणि आर्थिक स्थैर्य धोक्यात
पाण्याच्या अनियमित पुरवठ्यामुळे शेतीचं उत्पादन घटणा-र, त्यामुळे निर्यात कमी होणार आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या अशांततेमुळे व्यापारही अडचणीत येणार. हे सर्व घटक पाकिस्तानच्या आधीच डळमळीत असलेल्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त हादरा देतील.