(Image Source : Internet)
नवी दिल्ली :
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ५ वाजल्यापासून दोन्ही देशांमध्ये तात्काळ आणि पूर्ण युद्धविरामाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. ही घोषणा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विक्रम मिस्री (Vikram Misri) यांनी पत्रकार परिषदेत केली.
मिस्री यांनी सांगितले की, आज दुपारी ३:३५ वाजता पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी (डीजीएमओ) भारताच्या डीजीएमओंशी संवाद साधला. या चर्चेनंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पुढील लष्करी चर्चा १२ मे रोजी दुपारी १२ वाजता होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामाबाबतची माहिती दिली आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे दोन्ही देशांमध्ये रात्री उशिरापर्यंत झालेल्या संवादानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी दोन्ही देशांचे अभिनंदन करत ही शांततेसाठी महत्त्वपूर्ण घडी असल्याचे नमूद केले आहे.
अद्याप भारत सरकारकडून या संदर्भात पूर्ण अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी परराष्ट्र मंत्रालयाच्या संध्याकाळच्या पत्रकार परिषदेत यासंबंधी अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानच्या उपपंतप्रधान इशाक डार यांनी देखील युद्धविरामास मान्यता दिल्याचा दावा करत, भारतासोबत तत्काळ शस्त्रसंधी लागू झाल्याचे म्हटले आहे.
ट्रम्प यांनी काय सांगितले?
ट्रम्प यांनी एक्सवर लिहिले की, अमेरिकेच्या प्रयत्नांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामावर सहमती झाली आहे. दोन्ही देशांनी शांततेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.