(Image Source : Internet)
अकोला:
भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढती तणावपूर्ण स्थिती आणि जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातील एकूण ४० भाविक कटरा येथे अडकले असून, त्यांनी सरकारकडे तातडीच्या मदतीसाठी विनंती केली आहे.
बुलडाण्यातील खामगाव येथून वैष्णो देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या २२ भाविकांनी दर्शन पूर्ण केल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी तयारी केली होती. मात्र कटरा ते जम्मूपर्यंतचा प्रवास अडथळ्यामुळे पूर्ण होऊ न शकल्याने, ते सध्या कटरामधील एका खासगी हॉटेलमध्ये अडकून पडले आहेत. याच भाविकांमध्ये अकोला जिल्ह्यातील १८ इतर भाविकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या गटात १३ लहान मुलेही आहेत, ज्यामुळे काळजीचं वातावरण अधिक गडद झालं आहे.
या भाविकांनी प्रशासनाकडे आणि शासनाकडे विनंती केली असून, लवकरात लवकर त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करून गावी परतवण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे. सध्या ते अस्थायी स्वरूपात एका हॉटेलमध्ये थांबले असून, परतीसाठी कोणतीही निश्चित व्यवस्था उपलब्ध नसल्याने ते अत्यंत चिंतेत आहेत.