(Image Source : Internet)
नागपूर:
भारत (India) -पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील सर्व प्रशासनिक विभागांनी अधिक सजग राहावे, अशा सूचनांसह आज नियोजन भवनात जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली एक व्यापक आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे. जिल्ह्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयात उपस्थित राहतील, याची खबरदारी घेण्यात आली असून सर्वांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश-
तणावपूर्ण परिस्थितीमध्ये आरोग्य सुविधांची सखोल तपासणी करण्यात यावी आणि त्या पूर्णपणे कार्यक्षम ठेवाव्यात, असे आदेश देण्यात आले. आपत्कालीन सेवांसाठी रुग्णालयातील खाटांची, स्ट्रेचरची आणि सुरक्षा व्यवस्थेची तयारी शासकीय निकषांनुसार असावी. आवश्यकतेनुसार रक्त उपलब्ध व्हावे यासाठी नागपूरमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे निर्देशही देण्यात आले.
खोट्या अफवांवर कठोर कारवाई-
पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी स्पष्ट इशारा दिला की, सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या किंवा कायदा-सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या तरुणांविरोधात पोलिस कारवाई करतील, असेही त्यांनी सांगितले.
इंधन उपलब्धतेबाबत घाबरू नका-
जिल्ह्यात डिझेल, पेट्रोल आणि गॅस यांचा पुरेसा साठा असून नागरिकांनी घाबरून साठवणूक करू नये, फक्त आवश्यकतेनुसारच खरेदी करावी, अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.
या बैठकीला पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष संजय मीना, NDRF चे संचालक डॉ. हरिओम गांधी, जिल्हा परिषद सीईओ विनायक महामुनी, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, बी. वैष्णवी, उपविभागीय अधिकारी आणि विविध संस्थांचे सुरक्षा अधिकारी उपस्थित होते.