(Image Source : Internet)
नवी दिल्ली:
सीमारेषेवर सतत सुरू असलेल्या कुरापतींना आता केंद्र सरकारने कडक उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताविरोधातील कुठलेही दहशतवादी हल्ले हे ‘युद्धाच्या बरोबरीचे’ कृत्य म्हणून ओळखले जातील, अशी माहिती केंद्र सरकारने आज दिली.
सरकारच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की, दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुतेचे धोरण राबवले जाईल. भारताच्या सुरक्षेवर घाला घालणाऱ्या कोणत्याही कारवाया आता दुर्लक्षून चालणार नाहीत. भविष्यात देशाच्या विरोधात होणारे हल्ले हे थेट युद्ध मानून त्याला कडक आणि तितक्याच पातळीवर उत्तर दिलं जाईल.
संयुक्त पत्रकार परिषद सायंकाळी सहाला-
आज सायंकाळी ६ वाजता परराष्ट्र व संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग पाकिस्तानकडून घडणाऱ्या कारवायांबाबतची माहिती मांडणार आहेत. याआधी सकाळीही एक महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक पार पडली होती.
पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा आढावा-
पहलगाम येथे झालेल्या नुकत्याच हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीस संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सीडीएस आणि तीनही संरक्षण दलांचे प्रमुख उपस्थित होते. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यावर सखोल चर्चा झाली.