(Image Source : Internet)
नागपूर :
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केंद्र सरकारच्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे स्वागत करत तो निर्णय ऐतिहासिक आणि देशासाठी ‘स्वर्णिम दिवस’ असल्याचे म्हटले आहे.
बावनकुळे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतलेला जातीनिहाय जनगणनेचा निर्णय हा अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या मागणीचा पूर्णविराम आहे. याआधी केवळ अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि 'इतर' असा उल्लेख होत होता. आता मात्र SC, ST सोबत इतर सर्व जातींची स्वतंत्रपणे जनगणना होणार आहे.
ते पुढे म्हणाले, ओबीसी आंदोलन, मराठा आंदोलन आणि इतर समाजघटकांच्या आंदोलनांमधून ही मागणी वारंवार पुढे येत होती. ही मागणी आता प्रत्यक्षात उतरली आहे. हा निर्णय खऱ्या अर्थाने जनतेच्या मनातील आवाज आहे.
यावेळी काँग्रेसवर टीका करत बावनकुले म्हणाले, काँग्रेसने कधीही जातीनिहाय जनगणनेला गांभीर्याने घेतले नाही. अनेक दशकं सत्तेत असूनही त्यांनी ही मागणी नेहमीच दुर्लक्षित केली.
आता जे समुदाय शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहिले होते, त्यांना यातून न्याय मिळेल आणि समाजातील असंतुलन दूर होईल, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याबद्दल विचारले असता, बावनकुळे म्हणाले, पंतप्रधानांचा दौरा आधीच निश्चित झाला होता, त्यात काहीही नवीन नाही.