येत्या १० दिवसांत टोल धोरणात मोठा बदल होणार; वाहनचालकांसाठी केंद्रीय मंत्री गडकरींची मोठी घोषणा

    09-Apr-2025
Total Views |
 
Nitin Gadkari
 (Image Source : Internet)
नवी दिल्ली:
देशातील वाहनचालकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने स्पष्ट संकेत दिले आहेत की येत्या १० दिवसांत टोल धोरणात (Toll policy) मोठा बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे वाहनचालकांवरचा आर्थिक बोजा मोठ्या प्रमाणात हलका होणार आहे. एका विशेष कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भातील संकेत दिले.
 
टोल सिस्टिममध्ये बदलाची शक्यता-
गडकरी यांनी सांगितले की, टोल संकलन व्यवस्थेत सुधारणा करणे ही सरकारची प्राथमिकता आहे. त्याचाच एक भाग म्हणून लवकरच काही मार्गांवरील टोल शुल्क रद्द करण्याचा अथवा त्यामध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात येईल. यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे टोल संकलन प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत.
 
रस्ते अपघातांवर सरकार गंभीर -
या कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी देशातील रस्ते अपघातांबाबतही चिंता व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट केले की, सरकारचा उद्देश रस्ते अपघातांचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करणे हा आहे. मात्र, अद्याप हे लक्ष्य पूर्णपणे गाठता आलेले नाही. अपघातांचे प्रमुख कारण म्हणजे रस्त्यांची खराब गुणवत्ता, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि हेल्मेट न घालणे इत्यादी असून, या सर्व मुद्द्यांवर सरकार सातत्याने काम करत आहे.
 
वैयक्तिक अनुभवातून दिलेला संदेश-
वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देताना गडकरी यांनी स्वतःचा अनुभव सांगितला. मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर वाहतूक नियम मोडल्यामुळे त्यांना स्वतःला दंड भरावा लागला होता, हे त्यांनी खुल्या मनाने मान्य केले. “नियम हे सर्वांसाठी समान असावेत,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
 
सार्वजनिक शिस्तीबाबत खंत -
नागपूरमधील एका प्रसंगाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता न राखण्याच्या मानसिकतेमुळे देशाची प्रतिमा खराब होते. “शिस्त ही केवळ कायद्याने नव्हे, तर संस्कारांनीही शिकवावी लागते,” असे म्हणत त्यांनी लोकांनी सार्वजनिक शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले.