(Image Source : Internet)
नागपूर :
राज्यभरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात मोठी वाढ नोंदवली जात आहे. दुपारी सूर्य आग ओकत असून नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक 44.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्ण व दमट हवामान राहील, तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात सायंकाळनंतर तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उष्णतेची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमान ४० अंशांहून अधिक आहे.
मुंबई व उपनगरांतही उष्ण व दमट हवामानाची परिस्थिती कायम राहणार असून, नागरिकांना उन्हापासून संरक्षणासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, देशभरात तापमानात वाढ होत असून राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातसह ९ राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानातील काही भागात 45.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून, ते सध्या देशातील सर्वात उष्ण ठिकाण ठरत आहे.
एप्रिल ते जून दरम्यान तापमान सरासरीपेक्षा जास्त -
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, एप्रिल ते जून या काळात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. यंदा एप्रिलमध्ये राज्यात उष्णतेच्या लाटा जाणवण्याची शक्यता असून, नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे उष्णता कमी जाणवली होती. मात्र, एप्रिलमध्ये तापमान सातत्याने वाढत असून, उन्हाचा तडाखा अधिकच जाणवू लागला आहे.