(Image Source : Internet)
बीड :
परळीचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर त्यांची पत्नी करूणा मुंडे (Karuna Munde) यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, धनंजय मुंडेंच्या गटातील लोकांनी त्यांना दुबईत जाऊन लग्न करण्यासाठी तब्बल ५० कोटी रुपयांची ऑफर दिली होती. यासह त्यांनी अनेक गंभीर आरोप करत राजकीय वादळ निर्माण केले आहे.
करूणा मुंडे म्हणाल्या, माझ्या नवऱ्याच्या राजकीय कारकिर्दीचे वाटोळं या गुंडगटाने केले. त्यांनी नाचणाऱ्यांना घरात ठेवले आणि पत्नीला रस्त्यावर आणले. हे लोक राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, तेजस ठक्कर मी यांना सोडणार नाही. त्यांनी असंही म्हटलं की, मी कायद्याने दुसरं लग्न करू शकते. जर करायचं झालं, तर सगळ्या महाराष्ट्राला सांगून करेन. मला जर हेच हवं असते , तर मी दुबईत आरामात ५० कोटी घेऊन लग्न केले असते. पण मी संघर्ष निवडला आहे. करूणा मुंडे यांचा आरोप आहे की, त्यांच्या नवऱ्याकडून कोट्यवधींच्या प्रॉपर्टीवर सही करून घेण्यासाठी दलालांचा दबाव आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे धनंजय मुंडे आणि त्यांच्या वकिलाचे रेकॉर्डिंग आहे आणि लवकरच ते फेसबुकवर प्रसारित करणार आहेत. माझ्या गाडीत बंदूक टाकली गेली, त्याचं सत्य समोर आलं, तसंच लवकरच या प्रकरणातलंही सत्य समोर येईल. मी एकटीच लढतेय, पण माझ्या बाजूला माझा परमात्मा आहे, असेही त्या म्हणाल्या. तसेच, त्यांनी सविता वानखेडेंवरही आरोप करत, तिच्या नवऱ्याने माझ्याकडे पैसे मागितले होते, तिच्याविरुद्धही मी कायदेशीर लढाई लढणार, असे स्पष्ट केले.
करूणा मुंडेंनी थेट धनंजय मुंडेंना आव्हान दिलं आहे की, मंत्रिपद गेलं पण माज गेला नाही, तो माजही जाणार आहे. सहा महिन्यांत आमदारकी रद्द करून दाखवीन,असेही त्या म्हणाल्या.या आरोपांमुळे बीडच्या राजकारणात नवा वाद उफाळून आला असून, याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत.