(Image Source : Internet)
नागपूर :
राज्यात उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, अनेक भागांमध्ये तापमान चाळीशी पार करत आहे. विशेषतः विदर्भात उन्हाचा कहर अधिक जाणवत असून, अकोल्यात ४४.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी मुंबई, ठाणे आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा गंभीर इशारा दिला आहे.
मुंबई व ठाणे भागात उष्ण आणि दमट हवामान राहणार असून, गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. ठाण्यात सोमवारी तापमान विक्रमी ४२ अंशांवर पोहोचले. यामुळे स्थानिक आरोग्य यंत्रणा अलर्टवर असून, उष्माघात व उष्णतेशी संबंधित आजारांवरील लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
विदर्भातील अकोल्याबरोबरच ब्रह्मपुरी, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम व यवतमाळ येथेही तापमान ४२ अंशांच्या वर गेले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील तापमानात आणखी २ ते ४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने नागरिकांना शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर पडण्याचे टाळण्याचे आणि पाणी, फळांचा रस यांचा अधिक वापर करण्याचा सल्ला दिला आहे. उष्माघाताची लक्षणं जाणवू लागल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.