(Image Source : Internet)
राजकारणात भविष्यवाणी करणे हे धाडसाचे काम असते, पण शिवसेना (ठाकरे गट)चे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी नुकतेच केलेले विधान सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
जालना येथे एका लग्न समारंभात पत्रकारांशी संवाद साधताना खैरे यांनी भाकित वर्तवले की, २०२९ मध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील आणि तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील.त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना नवसंजीवनी मिळाली आहे.
भाजपवर टीकास्त्र सोडत खैरे म्हणाले, "२०१९ साली रावसाहेब दानवेंनी सिग्मा हॉस्पिटलमध्ये बसून माझा पराभव घडवून आणला. आमच्या नगरसेवकांनाच पैसे देऊन माझ्या विरोधात वापरलं." मात्र २०२४ मध्ये देवानेच न्याय केला, आणि जालन्यात दानवेंचा पराभव झाला, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. "मैदान अजून पुढं आहे, आम्ही पुन्हा परत येणार," असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.
दरम्यान, ठाकरे गटाने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या महापालिकांवर लक्ष केंद्रित करून तयारी युद्धपातळीवर सुरू झाली आहे. सध्या या महापालिकांमध्ये प्रशासकांचं राज्य असलं तरी येणाऱ्या निवडणुकीत वर्चस्व मिळवण्यासाठी ठाकरे गट सज्ज झाला आहे.
येत्या मंगळवारी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार असून, त्यात महापालिकानिहाय जबाबदाऱ्या नेते आणि उपनेत्यांमध्ये विभागल्या जाणार आहेत. रणनीती आखून, निवडणूक रिंगणात पाऊल ठेवण्याआधीच सुसज्ज होण्याचा निर्धार ठाकरे गटाने केला आहे.