(Image Source : Internet)
नागपूर :
उपराजधानी नागपूरमध्ये रामनवमीचा (Ram Navami) उत्सव अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक ढंगात साजरा करण्यात आला. शहरातील विविध मंडळांनी आयोजित केलेल्या शोभायात्रेमुळे संपूर्ण शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. जय श्रीरामच्या जयघोषांनी आसमंत दुमदुमून गेला आणि भगव्या पताका, बॅन्ड पथकं, ढोलताशा आणि विविध झांक्यांनी नटलेली ही शोभायात्रा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.
यंदाच्या शोभायात्रेत तब्बल ९० पेक्षा अधिक झांक्या सहभागी झाल्या होत्या. या झांक्यांमध्ये रामायणातील प्रसंग, श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या मूर्तींच्या सजीव झलकांचं सादरीकरण करण्यात आलं. काही मंडळांनी सामाजिक संदेशही झांक्यांमधून दिले, ज्यामध्ये स्वच्छता, पर्यावरणसंवर्धन व नारीशक्ती यासारख्या विषयांचा समावेश होता.
शोभायात्रा शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण करत श्रीराम मंदिरापर्यंत पोहोचली. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी पारंपरिक वेशात सहभागी होत उत्सवात रंग भरले. महिलांचा खास सहभाग असून त्यांनी भगव्या साड्यांमध्ये, आरती थाळी घेऊन उत्सवात भाग घेतला.
पोलीस व प्रशासनाने योग्य बंदोबस्त ठेवून गर्दीवर नियंत्रण मिळवलं. कुठलीही अनुचित घटना घडू न देता हा धार्मिक उत्सव शांततेत पार पडला.