(Image Source : Internet)
वाराणसी :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत (RSS) समाजात विविध मते व्यक्त केली जातात. काहीजण संघाला देशभक्त संघटना मानतात, तर काही त्याच्यावर धार्मिक पक्षपाताचा आरोप करतात. अनेक वेळा संघात मुस्लिमांचा सहभाग नसल्याचा मुद्दा उपस्थित केला जातो. मात्र, आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावर थेट भूमिका मांडली आहे.
वाराणसी दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना भागवत म्हणाले, संघात प्रत्येक भारतीयाचं स्वागत आहे, पण काही मूलभूत मूल्ये मान्य असणे आवश्यक आहे.
त्यांनी स्पष्ट केलं की, जो मुस्लिम ‘भारत माता की जय’ म्हणायला तयार आहे आणि भगवा ध्वजाचा आदर करतो, तो संघात सामील होऊ शकतो. म्हणजेच, धर्म महत्त्वाचा नसून राष्ट्रभक्ती आणि सांस्कृतिक मूल्यं मानणं आवश्यक आहे.
नागर कॉलनीतील संघ शाखेला दिलेल्या भेटीत त्यांनी विविध सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केलं. जातीयतेच्या भिंती पाडण्याचे, पर्यावरण संवर्धनाचे आणि मजबूत समाजनिर्मितीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं.
भागवत म्हणाले, भारताची संस्कृती सर्व धर्मांना एकत्र जोडणारी आहे. त्यामुळे कोणत्याही जाती, धर्म, पंथातील व्यक्तींना संघात सहभागी होता येते.फक्त त्यांना राष्ट्र आणि संस्कृतीशी निष्ठा असावी लागेल.
या विधानामुळे संघाच्या भूमिकेबाबत नवा सामाजिक दृष्टिकोन निर्माण होईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.