(Image Source : Internet)
मुंबई:
बदलापूर येथील अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात (Akshay Shinde encounter) आता एक नवा वळण आला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेत पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
अक्षय शिंदे यांच्या वडिलांनी एन्काऊंटरमध्ये संशय व्यक्त करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले की, त्या दिवशी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना वकील असीम सरोदे यांनी सांगितले की, “या प्रकरणात केवळ पोलिसांच्यावर नाही, तर त्यांच्यावर दबाव टाकणाऱ्यांचीही सखोल चौकशी झाली पाहिजे. एन्काऊंटरच्या फोटोसह राजकीय नेत्यांनी त्याचा प्रचार केला होता, त्यांच्यावरही कारवाई व्हावी.”
या आदेशामुळे प्रकरणात नवीन दिशा मिळाली असून पोलिस यंत्रणा आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता पुढे चौकशी कशी होते आणि जबाबदार कोण ठरतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.