(Image Source : Internet)
नवी दिल्ली :
केंद्र सरकारने (Central govt) सोमवारी (७ एप्रिल २०२५) जनतेला आर्थिक झटका देणारा निर्णय घेतला आहे. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण होत असल्यामुळे, या शुल्कवाढीचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार नाही, असा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे.
उत्पादन शुल्कात नेमकी किती वाढ?
नवीन अधिसूचनेनुसार, पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर १३ रुपयांवर गेले असून, डिझेलवर हे शुल्क १० रुपयांवर पोहोचले आहे. ही दरवाढ ८ एप्रिलपासून लागू होणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी सरकारने उत्पादन शुल्कात २ रुपयांची कपात केली होती.
शेअर बाजारात मोठी घसरण-
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, आज सकाळी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे भारतीय शेअर बाजारात तब्बल ३,००० अंकांची घसरण झाली. यामुळे लाखो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण-
अमेरिकन बेंचमार्क वायटीआय क्रूडची किंमत सुमारे ४% घटून $५९.४९ प्रति बॅरल, तर ब्रेंट क्रूडची किंमत $२.२५ घटून $६३.३३ प्रति बॅरल झाली आहे. यामुळे तेल कंपन्यांचे नफा प्रमाण वाढले असून, सरकारने तेच लक्षात घेऊन उत्पादन शुल्कात वाढ केल्याचं मानलं जात आहे.
भारताची तेलावरील परावलंबित्वता-
भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा कच्च्या तेलाचा आयातदार देश आहे. देशाच्या गरजेच्या ८७% कच्च्या तेलाची आयात केली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम देशांतर्गत इंधन दरांवर होतो.