मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठी कारवाई: ५७ टन गोमांस जप्त, हैदराबादस्थित कंपनीवर संशय

    05-Apr-2025
Total Views |
 
beef seized
 (Image Source : Internet)
लोणावळा :
मुंबई-पुणे एक्सप्रेस (Mumbai Pune Expressway) वेवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गोमांसाची तस्करी उघडकीस आणली आहे. दोन संशयास्पद एसी कंटेनर्समधून तब्बल ५७ हजार किलो गोवंशीय मांस जप्त करण्यात आले असून, या प्रकरणात हैदराबादमधील एशियन फूड्स मीन अँग्रो या कंपनीचा हात असल्याचे उघड झाले आहे.
 
गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठा घोटाळा उघड -
या प्रकरणाची माहिती पुण्यातील एका गोरक्षकाने पोलिसांना दिली होती. त्यानुसार, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून दोन कंटेनर्स संशयास्पद स्थितीत जात असल्याची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही कंटेनर्स ताब्यात घेतले.वाहतूकदारांनी सुरुवातीला ते म्हशीचे मांस असल्याचे सांगत कागदपत्रे दाखवली, मात्र गोरक्षक संघटनांनी आक्षेप घेत प्रयोगशाळा तपासणीची मागणी केली. तपासणी अहवालात मांस हे गोवंशीय असल्याचे स्पष्ट झाल्यावर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
 
हैदराबाद कनेक्शनमुळे तपासाला वेग-
या प्रकरणात नदीम कलीम अहमद आणि नसीर मोहंमद अहमद या चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्या चौकशीतून ही तस्करी हैदराबादच्या एशियन फूड्स मीन अँग्रो कंपनीच्या आदेशावरून होत असल्याचे समोर आले आहे. कंपनीचे मालक मोहम्मद सादिक कुरेशी यांच्यासह इतरांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
राज्यभरात संतापाची लाट-
या घटनेनंतर राज्यात गोमांस तस्करीच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली जात आहे. गोवंश संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाईचे संकेत देत पोलिस तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. सदर मांस नेमकं कुठे पाठवलं जाणार होतं, याचा तपास सुरू आहे.