जळगावमध्ये शरद पवार गटाला धक्का; 'या' नेत्याचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित

    30-Apr-2025
Total Views |
 
Sharad Pawar Ajit Pawar
 (Image Source : Internet)
जळगाव :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेत्यांची हालचाल सुरुच असून, शरद पवार (Sharad Pawar) गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी नगरविकास मंत्री गुलाबराव देवकर यांनी अजित पवार यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा ३ मे रोजी मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
 
देवकर यांनी सांगितले की, विकासकामांमध्ये अडथळे येत असल्याने आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर अजित पवार गटात इतरही अनेक दिग्गज नेत्यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या माहितीनुसार, माजी मंत्री सतीश पाटील, माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे, दिलीप वाघ तसेच महिला प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील हेही याच दिवशी पक्षात प्रवेश करणार आहेत.
 
दरम्यान, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा देखील रंगली आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय पवार यांनी सांगितले की, “सध्या केवळ ट्रेलर दाखवला आहे, संपूर्ण चित्रपट अजून उरलेला आहे.” काही नेत्यांची नावे अद्याप गुप्त ठेवण्यात आली असून लवकरच त्यावर अधिकृत माहिती दिली जाणार आहे.
 
याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री गुलाबरराव पाटील यांनी देवकर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना देवकर म्हणाले की, “मी कधीही भ्रष्टाचार केलेला नाही आणि कोणत्याही दबावाखाली निर्णय घेत नाही. पक्षप्रवेश हा वैयक्तिक निर्णय आहे.”
 
जळगाव जिल्ह्यातील ही राजकीय घडामोड शरद पवार गटासाठी मोठा झटका ठरू शकते, तर अजित पवार गटासाठी ही स्थिती आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.