नागपूरमध्ये बालगुन्हेगारीचा स्फोट; अल्पवयीन मुलांचा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग उघड !

    30-Apr-2025
Total Views |
 
Minors
 (Image Source : Internet)
नागपूर:
उपराजधानी नागपूरमध्ये (Nagpur) अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पोलीस प्रशासन चिंतेत आहे. गेल्या अडीच वर्षांत २०० हून अधिक अल्पवयीन मुलं गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे उघडकीस आले आहे.
 
चोरी, लूट, आणि खुनाच्या घटनांमध्ये नावे समोर येणाऱ्या या बालगुन्हेगारांच्या कारवायांमुळे पोलिसांची झोप उडाली आहे. विशेषतः एका प्रकरणात, केवळ १७ वर्षांच्या मुलाने, आपले तीन मित्र घेऊन १५ लाखांच्या सुपारीसाठी प्रॉपर्टी डिलरची हत्या केल्याची घटना खळबळजनक ठरली आहे. तो याआधी सुधारगृहात जाऊनही पुन्हा गुन्हेगारीकडे वळल्यामुळे यंत्रणेसमोर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
 
पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली अशा मुलांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. नागपूरच्या कपिल नगर, जरीपटका, अजनी, हुडकेश्वर, सक्करदरा, नंदनवन, गिट्टीखदान आणि अंबाझरी भागात अशा घटनांचा विशेष उच्चार केला जात आहे.
 
तज्ज्ञांच्या मते ही फक्त कायद्याची बाब नसून, सामाजिक, आर्थिक व कौटुंबिक पातळीवरील अपयशाचंही प्रतिबिंब आहे. अपुरी शिक्षण व्यवस्था, घरातले तणावाचे वातावरण, तसेच बाह्य गुन्हेगारी नेटवर्कचा प्रभाव – या सगळ्या बाबी बालगुन्हेगारीस कारणीभूत ठरत आहेत.
 
पोलीस विभागाने कठोर पावलं उचलण्याचे संकेत दिले आहेत, मात्र यासोबतच मुलांना वेळेवर दिशा देणं, समुपदेशन व शिक्षणाच्या माध्यमातून गुन्हेगारीपासून दूर ठेवणं ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.