(Image Source : Internet)
कोलकात्यातील बारा बाजार परिसरात मंगळवारी रात्री उशिरा एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मच्छुआ फल मंडीजवळील 'श्रुतुराज' हॉटेलमध्ये रात्री सुमारे ८:१५ वाजता ही घटना घडली. आगीची तीव्रता एवढी होती की अनेकांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उड्या मारल्या.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. आग नियंत्रणात आली असली तरी हॉटेलमधील १४ जणांना आपला जीव गमवावा लागला. घटनास्थळावरून मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अनेक जणांना वाचवण्यात यश आले आहे.
या घटनेची गांभीर्याने दखल घेत तपासासाठी एक विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले, कोलकात्यातील आग लागल्याच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल मी अत्यंत दुःखी आहे. आपल्या प्रिय व्यक्ती गमावलेल्या कुटुंबियांसाठी माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.
तसेच, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.