(Image Source : Internet)
नागपूर :
राज्यातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक माहिती समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर होणार असून, दहावीचा निकाल १५ किंवा १६ मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
उत्तरपत्रिकांची तपासणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यात आली असून सध्या निकालाच्या छपाईचे काम सुरू आहे. त्यामुळे काहीच दिवसांत विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फल मिळणार असल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान तर, दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत पार पडली होती. शिक्षण मंडळाने वेळापत्रकानुसार उत्तरपत्रिका तपासण्याचे निर्देश दिले होते आणि सर्व शिक्षकांनी त्यानुसार काम पूर्ण केले आहे.
बोर्डाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, ११ मे पर्यंत संपूर्ण निकाल तयार होईल, त्यानंतर १३ किंवा १४ मे रोजी बारावीचा निकाल आणि १५ किंवा १६ मे दरम्यान दहावीचा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांनीही ही माहिती देताना सांगितले की, सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून, पुढील आठवडाभरात गुणांची अंतिम पडताळणी होईल. निकालाबाबतची अधिकृत घोषणा लवकरच राज्याचे शिक्षणमंत्री करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.