गडचिरोलीत नक्षलवाद संपुष्टात येणार? नक्षलवाद्यांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव

    03-Apr-2025
Total Views |
 
Gadchiroli Naxalites
 (Image Source : Internet)
गडचिरोली:
गेल्या अनेक दशकांपासून नक्षलवादाच्या विळख्यात असलेल्या गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात मोठा बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहिल्यांदाच नक्षलवाद्यांनी केंद्र सरकारकडे शांततेचा प्रस्ताव पाठवला असून, त्यामुळे जिल्ह्यात लवकरच शांती नांदण्याची आशा निर्माण झाली आहे.
 
गेल्या ३५ वर्षांत प्रथमच नक्षलवाद्यांनी केंद्र सरकारशी चर्चेसाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी केंद्रीय गृह विभागाला पत्र पाठवले असून, युद्धाला पूर्णविराम द्यावा, अशी विनंती केली आहे. मागील दोन वर्षांपासून केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासह छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा, झारखंड या राज्यांमध्ये नक्षलवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे नक्षल चळवळीमध्ये अस्थिरता पसरली आहे.
 
गेल्या सहा महिन्यांत गडचिरोली जिल्ह्यात ३० नक्षलवादी ठार करण्यात आले असून, छत्तीसगडमध्ये हा आकडा १५० वर पोहोचला आहे. दीड वर्षांत ४०० हून अधिक नक्षलवादी ठार झाले आहेत. केंद्रीय गृह विभागाने २०२६ पर्यंत नक्षलवाद संपुष्टात आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
 
नक्षल चळवळीचे प्रमुख अभय उर्फ भूपती यांनी हे पत्र जारी केले असून, दोनदा गृह विभागाला चर्चेचा प्रस्ताव दिल्याचा उल्लेख त्यात आहे. मात्र, सरकारकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद आलेला नाही. आता या प्रस्तावावर केंद्र सरकार कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.