(Image Source : Internet)
नागपूर:
विदर्भात (Vidarbha) शनिवारी अचानक हवामानात झालेल्या बदलाचा परिणाम आगामी दिवसांमध्येही जाणवणार आहे. हवामान विभागाने नागपूरसह पूर्व विदर्भातील वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ३ मेपर्यंत हलक्याफुलक्या पावसासह जोरदार वाऱ्याचा इशारा दिला आहे.
तर, पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांत तुरळक पावसाची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी हवामानात झालेल्या या बदलामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी, दुपारी तापमान वाढल्याने पुन्हा गरमी जाणवू लागली आहे.
हवामान खात्याचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा -
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या काळात वाऱ्याचा वेग वाढू शकतो आणि काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
तापमानात चढ-उतार, आरोग्याची काळजी घ्या-
या हवामान बदलामध्ये तापमानात थोडी घसरण होण्याची शक्यता असून, नंतर पुन्हा ऊन तीव्र होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हवामानातील चढ-उतारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी हलके व सूती कपडे वापरणे, भरपूर पाणी पिणे आणि शक्यतो सूर्यप्रकाशापासून बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनीही घ्यावी काळजी-
पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांनीही त्यांच्या पिकांची काळजी घ्यावी, अशी सूचना कृषी विभागाकडून दिली जात आहे. हवामानातील या बदलांमुळे काही भागात शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.