येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत सर्व सरकारी सेवा ऑनलाइन होणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

    29-Apr-2025
Total Views |
 
Chandrashekhar Bawankule
 (Image Source : Internet)
नागपूर :
महाराष्ट्र शासन लवकरच एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलणार असून, येणाऱ्या स्वातंत्र्य दिनापर्यंत सर्व शासकीय सेवा पूर्णतः ऑनलाइन करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे. शासनाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि कार्यक्षमतेचा मूलभूत उद्देश ठेवत ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५’ अंतर्गत हा निर्णय राबवला जात आहे.
 
१,०२७ सेवांपैकी ५८३ सेवा आधीच ऑनलाइन-
शासनाच्या ३३ विभागांतील एकूण १,०२७ सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून, त्यातील ५८३ सेवा सध्या ऑनलाइन उपलब्ध आहेत. उर्वरित सेवा देखील स्वातंत्र्य दिनापूर्वी डिजिटल स्वरूपात नागरिकांना मिळतील, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या सेवेची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाईल, असा विश्वास पालकमंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला.
 
सेवा हक्क दिनानिमित्त विशेष कार्यक्रम-
‘सेवा हक्क अधिनियम’ लागू होऊन दहा वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने नियोजन भवनात "सेवा हक्क दिन" साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आमदार संजय मेश्राम, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी केले.
 
माहिती फलक आणि क्यूआर कोडचा उपयोग-
शासकीय कार्यालयांच्या दर्शनी भागात सेवा तपशील, कालमर्यादा, शुल्क, अपील अधिकाऱ्यांची माहिती स्पष्टपणे फलकाद्वारे लावणे बंधनकारक असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले. यावेळी अधिकृत सेवा दरांची माहिती सहज मिळावी यासाठी तयार करण्यात आलेल्या क्यूआर कोडचे अनावरण करण्यात आले.