एमएचटी-सीईटी परीक्षेतील चुकीच्या प्रश्नांचे गुण विद्यार्थ्यांना द्या; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची मागणी

    28-Apr-2025
Total Views |
 
Harshvardhan Sapkal
 (Image Source : Internet)
मुंबई :
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (MHT CET) २७ एप्रिल २०२५ रोजी पार पडली, पण या परीक्षेतील घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंता आणि नाराजी निर्माण झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील एक परीक्षा केंद्रावर गणित विषयाच्या ५० गुणांच्या पेपरमधील २० ते २५ प्रश्नांचे उत्तराचे पर्याय चुकीचे असल्याचे तक्रारी समोर आली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे, "गणिताच्या ५० प्रश्नांपैकी २० ते २५ प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय चुकीचे होते. काही प्रश्नांचे चारही पर्याय चुकीचे होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजाने चुकीचे उत्तर निवडावे लागले. यामुळे त्यांच्या भविष्यावर मोठा परिणाम होईल.
 
सडकलेल्या या घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राकडून तक्रारीचे समाधान मिळाले नाही, अशीही माहिती सपकाळ यांनी दिली. काही परीक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्याच्या तक्रारी समोर आल्या, परंतु त्यावरही योग्य प्रतिसाद मिळालेला नाही.
 
काँग्रेसने राज्य सरकारकडे निवेदन करून त्यांना विनंती केली आहे की, या चुकीच्या पेपरामुळे विद्यार्थ्यांना होणारे नुकसान दूर करण्यासाठी संबंधित संस्थांवर कठोर कारवाई करावी आणि पुढील वेळेस अशा प्रकारचा गोंधळ होणार नाही याची खबरदारी घ्यावी. सपकाळ यांनी जोर देत म्हटले की, "विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे.