बोगस शिक्षक घोटाळ्याची आता ईडी करणार सखोल चौकशी

    28-Apr-2025
Total Views |
 
ED
 (Image Source : Internet)
मुंबई :
महाराष्ट्रातील शिक्षण विभागात घोटाळ्याचा एक मोठा पर्दाफाश झाला आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ED) सुद्धा लक्ष घालून तपास सुरू केला आहे. या घोटाळ्यात गुंतलेल्या आरोपींचे आर्थिक व्यवहार आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची माहिती ED ने पोलिसांकडून मागवली आहे, ज्यामुळे आरोपींच्या अडचणी वाढू शकतात.
 
या घोटाळ्याची चौकशी नागपूर सायबर पोलिसांकडून सुरू असून, एनआयसी आणि महाआयटीच्या सर्वरकडून आवश्यक माहिती मागवली जात आहे. राज्य सरकारने देखील एसआयटी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, ज्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक सखोल होण्याची शक्यता आहे. राज्यभरात या घोटाळ्याबद्दल चर्चा रंगली आहे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
 
बोगस शिक्षक घोटाळ्याची विस्तार आणि तपास -
नागपूर जिल्ह्यात उघडकीस आलेल्या या घोटाळ्यात 580 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बनावट नियुक्ती करण्यात आली आहे. बोगस शालार्थ आयडी वापरून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असून, प्रत्येक नियुक्ती बदल्यात 20 ते 35 लाख रुपयांपर्यंत रक्कम घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या घोटाळ्यात वापरलेले संगणक, लॅपटॉप, मोबाईल डिव्हाइसेस आणि आयपी ऍड्रेस तपासण्याचे काम सुरू केले आहे. तसेच आरोपींच्या बँक खात्यांची चौकशी सुरू असून, वेतनाच्या व्यवहारांचा तपासही केला जात आहे.
 
राजकीय प्रतिक्रिया आणि चौकशीची मागणी -
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या घोटाळ्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी दोषी संस्थाचालकांवर कडक कारवाईची मागणी केली आहे, मात्र निरपराध व्यक्तींना त्रास होऊ नये, असा त्यांचा निर्धार आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.या प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.