(Image Source : Internet)
सिंधुदुर्ग :
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली असताना, केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात घेतलेल्या निर्णयांचे समर्थन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे. मात्र, याचवेळी त्यांनी केंद्राला इशारा दिला की, अशा निर्णयांचा भारतावर कुठला नकारात्मक परिणाम होणार नाही, याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.
सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना वसंतदादा पाटील ऊस संशोधन केंद्राच्या भेटीवेळी आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. पहलगाम हल्ल्याचा निषेध करताना त्यांनी धर्म विचारून हत्या करणे ही अतिशय गंभीर गोष्ट असल्याचे सांगितले. "अशा घटना देशात तणाव निर्माण करतात आणि समाजात दुरावा वाढवतात," असे ते म्हणाले.
पाकिस्तानविरोधात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांवर भाष्य करताना पवार म्हणाले, निर्णय योग्य असला तरी त्याचे दूरगामी परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर भारताने आपली विमानसेवा पाकिस्तानच्या हवाई मार्गातून थांबवली, तर त्याचा परिणाम आपल्या देशावरही होऊ शकतो.
या पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन देशाच्या सुरक्षेसाठी सरकारला पाठिंबा द्यावा, असेही आवाहन केले. "अशा संकटसमयी राजकारण न करता राष्ट्रीय एकतेला बळ द्यायला हवे, असे पवारांनी ठामपणे सांगितले.