सरकारची फक्त घोषणाबाजी, ठोस कृतीचा अभाव ; पहलगाम हल्ल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी केली टीका

    26-Apr-2025
Total Views |
 
Prakash Ambedkar
 (Image Source : Internet)
पुणे :
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये अधिक तणाव निर्माण झाला आहे. २२ एप्रिल रोजी घडलेल्या या भीषण घटनेत २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुलवामा नंतरचा हा सर्वात मोठा हल्ला मानला जात असून, या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून अटारी सीमाही बंद केली आहे.
 
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर घणाघात केला. "सरकारने घाईगडबडीत पर्यटकांना बाहेर काढले. ही मोठी चूक होती. त्यांना भीती नव्हती, तर सुरक्षिततेची शाश्वती हवी होती. सरकारने त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यायला हवी होती," असे त्यांनी सांगितले.
 
आंबेडकर पुढे म्हणाले, "झेलम व चिनाब नद्यांच्या पाण्याच्या वापराबाबत केंद्र सरकारने केवळ घोषणाबाजी केली आहे. प्रत्यक्षात पाणी वळवायचे कसे याचा कोणताही तपशील समोर आलेला नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रं खरेदी करूनही ठोस कारवाई का होत नाही, याचे उत्तर सरकारकडे नाही."
 
प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे म्हटले की, "सेना कारवाईसाठी सज्ज आहे, पण राजकीय नेतृत्व निर्णय घेण्यास अपयशी ठरत आहे. योजना केवळ कागदावर आहेत, प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही."
 
ते पुढे म्हणाले की, "२ मे रोजी आम्ही हुतात्मा स्मारकावर शांततापूर्ण आंदोलन करणार आहोत. कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न वापरता फक्त राष्ट्रध्वज घेऊन आंदोलनात सहभागी होणार आहोत. कारवाईला पाठिंबा देणाऱ्यांनी आपली सही देऊन पाठिंबा दर्शवावा."
 
धर्म विचारून गोळी मारल्याच्या प्रकरणावर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले, हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले सर्व भारतीय होते. यात धर्माचा कोणताही संबंध नाही. काही नेते मात्र आपापल्या राजकीय फायद्यासाठी नरेटीव्ह तयार करत आहेत. अशा गंभीर प्रसंगी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन देशाला विश्वासात घ्यायला हवे होते, पण दुर्दैवाने तसे झाले नाही.