(Image Source : Internet)
मुंबई :
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देशभरात संताप उसळला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कडक पावले उचलत सर्व राज्यांना पाकिस्तानी (Pakistani) नागरिकांविरोधात तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, मुदत संपल्यानंतर कोणताही पाकिस्तानी नागरिक देशात अवैधरीत्या राहू नये. या आदेशानुसार महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेतला असता धक्कादायक चित्र समोर आले आहे.
राज्यात सध्या ५०२३ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. यामध्ये केवळ ५१ जणांकडे वैध कागदपत्रे असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असून त्यांचा काहीही ठावठिकाणा सध्या पोलिस यंत्रणांना लागलेला नाही.
नागपूर शहरात सर्वाधिक २४५८ पाकिस्तानी नागरिक राहात आहेत. त्यानंतर ठाणे शहरात ११०६, नवी मुंबईत २३९, पिंपरी-चिंचवडमध्ये २९०, आणि मुंबईत १४ पाकिस्तानी नागरिकांची नोंद झाली आहे.
राज्य सरकारने आणि पोलिस प्रशासनाने आता या नागरिकांचा शोध घेण्याचे काम अधिक वेगाने सुरू केले आहे. बेपत्ता असलेल्यांचा मागोवा घेणे आणि देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती कठोर कारवाई करणे ही सध्याची अत्यंत गरजेची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होत आहे.
देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी ही कारवाई निर्णायक ठरणार आहे आणि भविष्यात अशा प्रकारच्या हालचालींवर कठोर नियंत्रण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.