समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; मेहकरजवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने दुर्घटना,दोघांचा मृत्यू!

    24-Apr-2025
Total Views |
 
accident on Samruddhi Highway
 (Image Source : Internet)
बुलडाणा:
समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) मेहकर तालुक्यातील नागपूर कॉरिडॉरवर गुरुवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातात ठाणे येथील दोघांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. वाहनचालकाला झोप येऊन गाडीवरील ताबा सुटल्यामुळे ही दुर्घटना घडली. ही घटना समृद्धी महामार्गाच्या नागपूर कॉरिडॉरवरील जंक्शन क्र. २९९.१ जवळ घडली. ठाण्याहून बिहारच्या दिशेने जात असलेली कार चालक विकास कुमार प्रभु सिंह याच्या ताब्यातून झोपेमुळे सुटली आणि थेट पुलाच्या कडेला जाऊन आदळली.
 
या भीषण अपघातात कारचालक विकास कुमार आणि प्रवासी गुड्डू सिंह (वय २८) यांचा जागीच मृत्यू झाला. कारमध्ये प्रवास करत असलेले प्रदीप सुरेश चव्हाण (वय ३८), मनीष कुमार, प्रेमचंद सिंह (वय २८) आणि नितेश कुमार (वय २८) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की कारचा समोरील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला होता.
 
दरम्यान महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या दुर्घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनचालकांनी लांब प्रवासात विश्रांती घेणे, झोप पूर्ण करूनच वाहन चालवणे अत्यंत आवश्यक असल्याचा पुनः एकदा प्रत्यय या घटनेतून आला आहे.