(Image Source : Internet)
मुंबई :
माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) यांना पुन्हा एकदा प्राणघातक धमकीचा सामना करावा लागत आहे. एका ईमेलच्या माध्यमातून त्यांना गंभीर स्वरूपाची जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून, धमकी देणाऱ्याने त्यांच्या वडिलांप्रमाणेच त्यांचाही खात्मा करण्याचा इशारा दिला आहे.
या ईमेलमध्ये “जे वडिलांबरोबर घडलं, तेच तुझ्यासोबत घडेल” असं ठणकावत सांगण्यात आलं आहे. या मेलद्वारे झिशान यांच्याकडे तब्बल १० कोटी रुपयांची खंडणीही मागण्यात आली आहे. ‘दिलशाद’ नावाच्या व्यक्तीने आतापर्यंत तीन वेळा ईमेल पाठवले असून, प्रत्येक सहा तासांनी धमकीची आठवण करून देणारे मेल्स पाठवले जात आहेत. या मेलच्या डिस्प्लेवर बंदूक आणि गोळ्यांचे चित्रही दाखवण्यात आलं आहे.
१२ ऑक्टोबर २०२४ रोजी वांद्रे पूर्व परिसरात बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी टार्गेटवर आल्याने कुटुंब पुन्हा धास्तावले आहे.
मुंबई पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून, झिशान यांच्या निवासस्थानी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पोलिसांकडून या धमक्यांचा गंभीर दृष्टीने तपास सुरू आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या ४५९० पानी आरोपपत्रात २६ आरोपींची नावं आहेत, ज्यामध्ये अनमोल बिश्नोई, झिशान अख्तर आणि शुभम लोणकर यांचा समावेश आहे.