(Image Source : Internet)
पुणे:
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला असून, यंदाच्या यादीत पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसऱ्या क्रमांकावर झळकला आहे. प्रयागराजची शक्ती दुबे हिने सर्वोच्च रँक मिळवत अव्वल स्थान पटकावले, तर दुसऱ्या क्रमांकावर हरियाणाच्या हर्शिता गोयलने बाजी मारली आहे. अर्चितने महाराष्ट्रातून पहिल्या क्रमांकावर नाव नोंदवत राज्याचा सन्मान वाढवला आहे.
या यशामुळे अर्चितच्या कुटुंबात साजरा करण्यासारखे वातावरण असून, त्याच्या अथक मेहनत, नियमित अभ्यास आणि प्रबळ इच्छाशक्तीचे फळ म्हणून हे यश त्याला मिळाले आहे.
सप्टेंबर २०२५ मध्ये यूपीएससीची मुख्य परीक्षा झाली होती आणि त्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये मुलाखतींचे सत्र पार पडले. यंदा एकूण १००९ उमेदवारांची निवड झाली असून, त्यापैकी २४१ जणांची अंतिम यादीत नावे झळकली आहेत.
यशस्वी उमेदवारांमध्ये आणखी काही महत्वाची नावे अशी आहेत – शाह मार्गी चिराग (४ रँक), आकाश गर्ग (५ रँक ), कोमल पुनिया (६ रँक), आयुषी बन्सल (७ रँक), राज कृष्णा झा (८ रँक ), आदित्य विक्रम अग्रवाल (९रँक ) आणि मयंक त्रिपाठी (१०रँक ) मिळवली आहे.
प्रशासकीय सेवेत कारकीर्द घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य तरुणांसाठी हा निकाल प्रेरणादायी ठरतो. या उमेदवारांनी प्रचंड मेहनत, चिकाटी आणि संयमाने हे यश संपादन केले आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना आयएएस प्रशिक्षणासाठी लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकॅडमी (LBSNAA), तर आयपीएस उमेदवारांना सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाणार आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!