(Image Source : Internet)
पहलगाव :
जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये (Pahalgam) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २० लोकांचा मृत्यू झाला असून १० पर्यटक जखमी झाले आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यवस्थ आहे.
हल्ला बैसरन या डोंगराळ भागात झाला असून, दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार करत पर्यटकांना लक्ष्य केले. या हल्ल्यानंतर लगेचच लष्कर, पोलिस व निमलष्करी दलांचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य हाती घेतले.
हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या भ्याड कृत्याचा निषेध केला आहे. मृतांच्या नातेवाईकांप्रती संवेदना व्यक्त करत, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घटनेची माहिती दिल्याचेही त्यांनी सांगितले.
शाह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरक्षा यंत्रणांशी चर्चा केली असून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लवकरच श्रीनगरला जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
बैसरन हे ठिकाण पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध असून, तेथे केवळ पायी जाणे शक्य आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असते, त्यामुळे हा हल्ला अधिक धक्कादायक ठरतो.
सदर हल्ला या वर्षातील पहिला मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. याआधी गेल्या वर्षी मे महिन्यात अशाचप्रकारे हल्ला करण्यात आला होता, त्यामध्ये दोन पर्यटक जखमी झाले होते. त्या वेळीही हल्ल्याचे ठिकाण पहलगामच होते.
सध्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेची पातळी वाढवण्यात आली आहे. संशयित दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे.