(Image Source : Internet)
पहलगाम:
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाम (Pahalgam) येथे मंगळवारी (२१ एप्रिल) दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात २० हून अधिक पर्यटकांच्या मृत्यूची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भीषण हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेल्या पर्यटकांची नावे अतुल मोने आणि दिलीप डिसले अशी आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा कडक शब्दात निषेध केला आणि म्हटले की, "देशविरोधी शक्तींचा नायनाट करणे अनिवार्य आहे, आणि भारत शांत बसणार नाही." फडणवीस पुढे म्हणाले की, "जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत असताना, अशा हल्ल्यांमुळे ती शांतता धोक्यात येत आहे. मात्र, भारत कोणत्याही दबावाला तोंड न घालता सामना करेल."
देशभरातून या अमानुष हल्ल्याच्या निषेधासह तीव्र प्रतिक्रिया उमठत आहेत. दहशतवादी संघटना 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. TRF लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असून, पाकिस्तानातील शेख सज्जाद गुल हा या संघटनेचा प्रमुख आहे.
जम्मू-काश्मीर प्रशासन मदतकार्य सुरू करत आहे आणि महाराष्ट्र सरकार देखील त्यांच्याशी संपर्क साधत आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. या घटनेंचा परिणाम देशभर होण्याची शक्यता असून, केंद्र आणि राज्य सरकार कडून कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट आहे.