(Image Source : Internet)
मुंबई:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या मत्स्य व्यवसाय विभागाशी संबंधित एक मोठा आणि भविष्य घडवणारा निर्णय घेण्यात आला. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी देखील मोठ्या आर्थिक तरतुदीला मंजुरी देण्यात आली आहे.
गोसीखुर्द प्रकल्पासाठी एकूण २५,९७२ कोटी ६९ लाख रुपयांच्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेला मंजुरी मिळाली आहे.
मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी क्षेत्रासारखा दर्जा देण्याचा निर्णय हा ऐतिहासिक ठरणार आहे, असे नितेश राणे यांनी सांगितले. या निर्णयामुळे राज्यात मच्छीमारांना कृषी क्षेत्रातील लाभ जसे की कर्ज, वीजदरातील सवलत, विमा, सौर ऊर्जेचा लाभ मिळणार आहे.
राज्यात सध्या सागरी मासेमारीमध्ये सहाव्या स्थानावर असलेले महाराष्ट्र, या निर्णयामुळे देशात पहिल्या तीन क्रमांकात येऊ शकतो. सुमारे ४ लाख ६३ हजार मच्छीमारांना थेट फायदा होणार आहे.
आज घेण्यात आलेले ८ निर्णय पुढीलप्रमाणे आहेत:
ग्रामविकास विभाग: सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यास मंजुरी. स्मारकासाठी १४२.६० कोटी आणि प्रशिक्षण केंद्रासाठी ६७.१७ लाख रुपये मंजूर.
जलसंपदा विभाग: भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी २५,९७२ कोटी ६९ लाख रुपयांच्या सुधारीत तरतूदीस मान्यता.
कामगार विभाग: महाराष्ट्रातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करत नवा कामगार संहितेचा मसुदा तयार करण्याचा निर्णय.
महसूल विभाग: कंत्राटी विधी अधिकाऱ्यांचे मानधन वाढवून ५० हजार रुपये करण्यास मान्यता.
विधी व न्याय विभाग: १४व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या १६ अतिरिक्त व २३ जलदगती न्यायालयांना दोन वर्षांची मुदतवाढ.
मत्स्यव्यवसाय विभाग: मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखा दर्जा देण्याचा निर्णय; मच्छीमारांना विविध अनुदाने व योजनांचा लाभ.
गृहनिर्माण विभाग: झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत सुधारणा करत पायाभूत सुविधांची अंमलबजावणी जलदगतीने करण्याचा निर्णय.
सार्वजनिक बांधकाम विभाग: पुणे जिल्ह्यातील तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाचे विस्तारीकरण; तळेगाव-चाकण रस्ता चार पदरी व चाकण-शिक्रापूर रस्ता सहा पदरी करण्यात येणार.