(Image Source : Internet)
मुंबई:
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महिलांमध्ये लोकप्रिय ठरलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ बंद होणार असल्याच्या चर्चांवर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी (Aditi Tatkare) स्पष्ट भाषेत उत्तर दिलं आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, ही योजना कायम सुरू राहणार असून, पात्र महिलांना तिचा लाभ नियमितपणे मिळत राहील.
अधिकार मिळवण्यासाठी स्पष्ट निकष लागू-
विधानसभा निवडणुकीनंतर काही ठिकाणी या योजनेबाबत गैरसमज पसरले होते आणि विरोधकांकडून सरकारवर टीका होत होती. या पार्श्वभूमीवर बोलताना तटकरे म्हणाल्या, “ही योजना थांबवली जात आहे, असा चुकीचा समज निर्माण झाला आहे.” त्यांनी योजनेसाठी लागणाऱ्या अटींची माहिती दिली. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महिलेचं वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावं लागतं.
तसेच, ज्या महिलांना ‘संजय गांधी निराधार योजना’चा लाभ मिळतो, त्या महिलांना ‘लाडकी बहीण योजना’साठी पात्र ठरवण्यात येणार नाही, हे त्यांनी ठामपणे सांगितलं. काही अपात्र महिलांना सुरुवातीला लाभ मिळाल्याचं लक्षात आलं असून, अशा अर्जांची तपासणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
शेतकरी महिलांसाठी विशेष लाभ-
तटकरे यांनी सांगितलं की, ‘नमो शेतकरी योजने’तून १००० रुपये मिळणाऱ्या महिला शेतकऱ्यांना ‘लाडकी बहीण योजना’अंतर्गत अतिरिक्त ५०० रुपये दिले जातात, म्हणजे त्यांना एकूण १५०० रुपये मिळतात. हा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे.
महिलांचा वाढता सहभाग-
या योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय वाढली आहे. आधी २.३३ कोटी महिला लाभार्थी होत्या, तर आता ती संख्या २.४७ कोटींवर गेली आहे. यावरून योजना प्रभावीपणे राबवली जात असल्याचं स्पष्ट होतं. महायुती सरकारनं निवडणुकीतील यशाचं श्रेय राज्यातील महिलांना दिलं असून, लाडकी बहीण योजना भविष्यातही सुरूच राहणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.