(Image Source : Internet)
मुंबई:
सांगली जिल्ह्यातील चार दिग्गज माजी आमदार व सुमारे डझनभर प्रभावशाली नेते येत्या मंगळवारी (ता. २२) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील होणार आहेत. मुंबईतील नरिमन पॉईंट येथील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असून, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल.
या सोहळ्यात माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार राजेंद्र देशमुख, जत तालुक्यातील युवा नेते तम्मनगौडा रविपाटील, सुरेश शिंदे आणि नीलेश येसुगडे यांचा समावेश असणार आहे. या प्रमुख नेत्यांचा पक्षप्रवेश जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या पुढाकाराने घडत आहे. यावेळी जिल्ह्यातील अनेक स्थानिक पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.
गेल्या महिन्यात या नेत्यांमध्ये दोनवेळा चर्चा झाल्या. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधत त्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या. प्रवेशानंतर कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील आणि जिल्ह्यासाठी काय योगदान देता येईल, यावर सखोल चर्चा झाली. आता हे नेते मंगळवारी अधिकृतपणे ‘घड्याळ’ हाती बांधणार आहेत.
विलासराव जगताप यांनी सांगितले, "आम्ही कायमच पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला आहे. काही काळ भाजपमध्ये होतो, पण विचारधारा कधीच बदलली नाही. अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय हाच पुरोगामी विचार पुढे नेण्यासाठी आहे. ते सत्तेत असले तरी विकासाच्या दृष्टीकोनातून काम करत आहेत. मी म्हैसाळ योजनेसाठी तातडीने निधी मिळावा, अशी विनंती वैयक्तिकरित्या केली आहे."
या घडामोडींमुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.