(Image Source : Internet)
नवी दिल्ली :
‘नॅशनल हेराल्ड’ (National Herald) प्रकरणात काँग्रेस नेत्यांविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दाखल केलेल्या आरोपपत्रावर काँग्रेसने कडाडून निषेध केला असून, याविरोधात पक्षाने व्यापक जनजागृती मोहीम सुरू केली आहे. २१ ते २७ एप्रिल या कालावधीत देशभरातील ५७ शहरांमध्ये काँग्रेसकडून पत्रकार परिषदा आयोजित करण्यात येणार आहेत.
या उपक्रमाला ‘काँग्रेसचे सत्य, भाजपचे फसवे दावे’ असे नाव देण्यात आले आहे. या माध्यमातून भाजपकडून काँग्रेसवर लादण्यात येणाऱ्या कथित खोट्या आरोपांचे खंडन करण्यात येणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी सांगितले की, विजयवाडा ते वाराणसी आणि काश्मीर ते केरळ, विविध काँग्रेस नेते भाजपच्या खोट्या आरोपांमागील हेतू उघड करण्यासाठी देशभर दौरे करतील. त्यांनी पत्रकार परिषदांचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुख ५७ नेत्यांची यादी प्रसिद्ध केली असून, यात शशी थरूर, भूपेश बघेल, अशोक गेहलोत, कन्हैया कुमार, सुप्रिया श्रीनेट, पी. चिदंबरम यांचा समावेश आहे.
१९ एप्रिल रोजी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या मोहिमेची आखणी करण्यात आली. यावेळी खरगे म्हणाले की, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना सूडबुद्धीने या प्रकरणात गोवले जात आहे. “न्यायव्यवस्थेचा वापर करून विरोधकांना दडपण्याचा हा प्रयत्न असून काँग्रेस कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
खरगे यांनी यापूर्वीही सरकारवर टीका करताना म्हटले होते की, अहमदाबाद अधिवेशनाच्या काळात तसेच रायपूर अधिवेशनावेळीही ईडी आणि सीबीआयच्या छाप्यांचा वापर करून काँग्रेसला लक्ष्य करण्यात आले.
नॅशनल हेराल्ड प्रकरणाचे मूळ काय?
२०१२ मध्ये भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या खटल्यात असा आरोप करण्यात आला होता की, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ‘यंग इंडियन’ नावाच्या संस्थेच्या माध्यमातून ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ (AJL) वर ताबा मिळवला. या संस्थेमार्फत ‘नॅशनल हेराल्ड’ हे वृत्तपत्र चालवले जात होते.
स्वामी यांच्या म्हणण्यानुसार, या व्यवहारात २००० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार केवळ ५० लाख रुपयांत झाला असून, हा एक प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार आहे. त्यांनी या प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी व इतर नेत्यांविरोधात कारवाईची मागणी केली होती.
काँग्रेसने आता या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत भाजपचा खोटारडेपणा उघड करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.