ATM व्यवहार 1 मेपासून महागणार; बॅलन्स तपासायलाही लागणार पैसे

    21-Apr-2025
Total Views |
 
ATM
 (Image Source : Internet)
नागपूर:
देशभरात डिजिटल पेमेंट्सचा वापर झपाट्याने वाढत असतानाही, एटीएममधून रोख रक्कम काढणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ग्रामीण भागांपासून शहरी भागांपर्यंत अनेक बँका, सहकारी संस्था आणि पतसंस्था ATM सेवा देत आहेत. आता या सेवेशी संबंधित महत्त्वाचे नियम 1 मेपासून बदलणार आहेत. या बदलामुळे ग्राहकांना आता ATM वापरण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
 
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या शिफारशींनंतर रिझर्व्ह बँकेने (RBI) एटीएम व्यवहारांवरील शुल्कवाढीला मान्यता दिली आहे. नव्या नियमानुसार, ठराविक मोफत व्यवहारांनंतर दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास आता 17 ऐवजी 19 रुपये शुल्क लागणार आहे. तसेच, बॅलन्स तपासण्यासाठी लागणारे शुल्क देखील 7 रुपयांवरून 9 रुपये इतके झाले आहे.
 
सध्या ग्राहकांना मेट्रो शहरांमध्ये 5 आणि इतर भागांमध्ये 3 मोफत एटीएम व्यवहारांची मर्यादा दिली जाते. या मर्यादेनंतर होणाऱ्या प्रत्येक व्यवहारावर शुल्क आकारले जाते. त्यामुळे आपल्या बँकेच्या एटीएमऐवजी दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरणाऱ्यांवर याचा थेट परिणाम होणार आहे.
 
दरम्यान, एटीएम ऑपरेट करणाऱ्या कंपन्यांनी ऑपरेशन आणि देखभालीचा खर्च वाढल्याने इंटरचेंज फी वाढवण्याची मागणी केली होती. NPCI ने ही बाब RBI समोर मांडली असून, ती आता स्वीकारण्यात आली आहे.
 
डिजिटल व्यवहारांवर भर देण्याचा सल्ला-
ATM व्यवहारांवरील खर्च वाढल्याने आता ग्राहकांनी शक्यतो आपल्या बँकेच्या एटीएमचा वापर करावा किंवा UPI, मोबाईल बँकिंग आणि नेटबँकिंगसारख्या डिजिटल माध्यमांचा उपयोग करावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. त्यामुळे अतिरिक्त शुल्क टाळता येऊ शकते आणि व्यवहारही अधिक सोपे होतील.