(Image Source : Internet)
मुंबई :
राज्यात नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. या संकटात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी सरकारने पीकविमा योजना राबवली होती. एक रुपयांत पीकविमा मिळवून देणारी योजना सुरु करण्यात आली होती. मात्र, या योजनेबाबत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे, जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
'योजनेचा गैरफायदा घेतला गेला -
दिशा कृषी उत्पन्न कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, “काही काळापूर्वी आम्ही अत्यंत कमी दरात – फक्त एका रुपयांत पीकविमा उपलब्ध करून दिला होता. मात्र, दुर्दैवाने या योजनेचा गैरवापर झाला. अनेकांनी फसवणूक केली. सरळ भाषेत सांगायचं झालं तर आम्हाला फसवलं गेलं. त्यामुळे ती योजना मागे घ्यावी लागली."
नवीन स्वरूपात योजना आणण्याचा इशारा-
"आता आम्ही शेतकऱ्यांसाठी नव्याने योजना आणणार आहोत. आधीच्या योजनेत सुधारणा करून विश्वासार्ह आणि लाभदायक प्रणाली तयार केली जाईल. या वेळी निर्णय घेण्याआधी शेतकऱ्यांशी चर्चा केली जाईल आणि त्यांचा सहभाग असलेली योजना सादर केली जाईल. लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेतला जाईल,” असेही पवार यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा शब्द--
अजित पवार पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांना इतकं हताश होता कामा नये की ते आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतील. आपण त्यांच्या पाठीशी आहोत. मी आज अर्थमंत्री म्हणून सात लाख वीस हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्यातील कोणताही शेतकरी एकटं पडू देणार नाही. त्यांच्या पाठीशी सरकार ठाम उभं राहील. तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.