(Image Source : Internet)
अलीगढ:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) सध्या अलीगढच्या दौऱ्यावर असून, त्यांनी स्वयंसेवकांना समाजातील विभाजन मिटवून ऐक्य प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. अलीगढमध्ये सुरू असलेल्या पाच दिवसांच्या कार्यक्रमात भाग घेत असताना, त्यांनी दोन वेगवेगळ्या शाखांमध्ये स्वयंसेवकांशी संवाद साधला.
या संवादादरम्यान भागवत म्हणाले की, "हिंदू समाजाने 'एक देवस्थान, एक पाणी स्रोत आणि एकच स्मशानभूमी' ही भूमिका स्वीकारली पाहिजे. यामुळे समाजामध्ये समभाव आणि बंधुभाव वाढेल." त्यांनी असेही सांगितले की, सामाजिक सलोखा हे भारताच्या जागतिक भूमिकेसाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे.
भागवत यांनी नमूद केले की, हिंदू संस्कृतीचा पाया संस्कार, परंपरा आणि नैतिक मूल्यांवर आधारित आहे. त्यांनी सांगितले की, समाजाने या मूल्यांना आत्मसात करावे आणि सर्व स्तरांतील लोकांना समाविष्ट करून समाजाला एकत्र आणावे.
स्वयंसेवकांना उद्देशून त्यांनी सांगितले, “समाजातील विविध घटकांशी आपुलकीने संबंध जोडा, त्यांना आपल्या घरी आमंत्रित करा. यामुळे एकतेचा संदेश घराघरात पोहोचेल.” कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, घर ही समाजाची मूलभूत घटक आहे आणि ती संस्कारांनी समृद्ध असावी.
त्याचबरोबर सण-उत्सव सामूहिक स्वरूपात साजरे करण्याचाही सल्ला त्यांनी दिला. “सण एकत्र साजरे केले की सामाजिक एकोपा वाढतो आणि राष्ट्रीय भावना बळकट होते,” असे त्यांनी सांगितले.
मोहन भागवत यांचा अलीगढ दौरा १७ एप्रिल रोजी सुरू झाला असून, ते संघाच्या प्रचारकांशी विविध बैठकी घेत आहेत. २०२५ मध्ये होणाऱ्या संघाच्या शताब्दी सोहळ्याच्या तयारीचा हा दौरा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.