(Image Source : Internet)
मुंबई :
वक्फ सुधारणा विधेयकावरुन खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. वक्फ सुधारणा विधेयक आज संसदेत मांडलं जाणार आहे. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे गटाला डिवचत एक X वर पोस्ट केले.
फडणवीस म्हणाले की, बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार? यावर आता राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राऊत यांनी देखील X वर पोस्ट करत म्हटले की, “देवेंद्र जी,वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्ववाचा काडीमात्र संबध नाही, ही तुमच्या पक्षाची एक खाज आहे गोंधळ निर्माण करण्याची!विषय राहुल गांधींचा, त्यांच्या आजीने अमेरिकेला दम भरला होता; आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा बदला घेतला होता! तुमच्यात हा दम आहे?बोला, असे राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान उद्धव ठाकरे गटाची वक्फ सुधारणा विधेयकावरून भूमिका काय आहे. यावरही राऊत यांनी भाष्य केले. आमची ठरलेली भूमिका तुम्हाला शेवटच्या क्षणी दिसेल. काही गोष्टी फ्लोअरवर गेल्यावर करायच्या असतात, त्या आम्ही करु, असे राऊत म्हणाले.