(Image Source : Internet)
मुंबई:
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोन महत्वाचे नेते, जे अनेक वर्षांपासून एकमेकांपासून दूर होते, ते आता पुन्हा एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मराठी अस्मितेला धक्का देणाऱ्या प्रवृत्तींविरोधात ही एकजूट घडत असेल, तर ती महाराष्ट्रासाठी मोठी गोष्ट ठरेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
रोहित पवार म्हणाले, जर ठाकरे बंधू राजकीय मतभेद विसरून एकत्र येत असतील, तर हे केवळ एक राजकीय ठराव नाही, तर मराठी मनांचा विजय आहे. प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक घराने आता महाराष्ट्रधर्मासाठी एकत्र यायला हवे.
या संभाव्य युतीवर खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “राज ठाकरे यांनी मतभेदांपेक्षा महाराष्ट्राचे प्रश्न मोठे मानले. हे ऐकून मन हेलावून गेलं. बाळासाहेब ठाकरे आज असते, तर त्यांचा अभिमान दुणावला असता. आमच्या कुटुंबाचे त्यांच्याशी फार जिव्हाळ्याचे नाते आहे.
त्यांनी पुढे सांगितले, हा क्षण राजकीय इतिहासात नोंदवला जाणार आहे. महाराष्ट्रासाठी दोघे भाऊ एकत्र येत असतील, तर हे स्वागतार्ह आणि प्रेरणादायी आहे.