(Image Source : Internet)
नागपूर:
महाराष्ट्रात सध्या मराठी (Marathi) अस्मिता आणि हिंदी भाषा यावरून वातावरण तापले असताना, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मराठी ही आपली ओळख आहे आणि ती अबाधित राहील. पण राष्ट्रीय स्तरावर हिंदी शिकणंही तितकंच महत्त्वाचं आहे,असं ते म्हणाले.
बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की, “हिंदीच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण केलं जातंय. मात्र, मराठी भाषेवर कोणताही आघात होऊ देणार नाही. मातृभाषेला कुठेही डावललं जाणार नाही.”
हिंदी 'राजभाषा', राष्ट्रभाषा नव्हे-
एका कार्यक्रमात हिंदीला ‘राष्ट्रभाषा’ म्हणाल्यामुळे झालेल्या गोंधळावर त्यांनी खुलासा करत सांगितलं, “काल मी चुकून हिंदीला राष्ट्रभाषा म्हटलं, पण माझा हेतू ‘राजभाषा’ असा होता. भारतात हिंदी ही राजभाषा आहे, राष्ट्रभाषा नाही.”
मराठीची जपणूक आणि हिंदीचं व्यवहारिक महत्त्व-
बावनकुळे पुढे म्हणाले, “मराठी हीच आमची खरी ओळख आहे. तिचं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे. पण व्यवहारात हिंदी भाषेचं महत्त्व नाकारता येत नाही. देशातील बहुतांश भागात हिंदी समजली जाते आणि सरकारी यंत्रणांमध्ये तिचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.”
शिक्षण आणि प्रशासनात हिंदीचं स्थान-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात हिंदी विषयाचा समावेश असतो, हे नमूद करताना बावनकुळे म्हणाले, “देशातील 60 टक्क्यांहून अधिक राज्यांमध्ये प्रशासन हिंदीत चालतं. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हिंदीचा प्रमुख वापर आहे. त्यामुळे एक सामान्य संपर्क भाषा म्हणून हिंदी शिकणं गरजेचं आहे.”
या वक्तव्यानंतर राज्यातील मराठी विरुद्ध हिंदी वादावर एक वेगळं परिप्रेक्ष आणण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला आहे. मराठीचा अभिमान राखत हिंदीच्या गरजेची जाणीव ठेवणं, हीच या वक्तव्यामागची भूमिका असल्याचं दिसतं.