(Image Source : Internet)
बुलडाणा:
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस (Congress) पक्ष सावरण्याचा प्रयत्न करत असताना, पक्षाला जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागत आहे. नुकतेच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बुलडाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करण्यात आली. मात्र या बदलानंतरही काँग्रेसचा डाव सावरलेला नाही.
पुण्यातून रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता बुलडाणा जिल्ह्यातील एक अनुभवी आणि प्रभावशाली नेते दिलीप सानंदा यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा जोर धरू लागली आहे. तीन वेळा आमदार राहिलेले सानंदा सध्या पक्षात नाराज असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सानंदा यांच्याशी संबंधित बाजार समितीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी नुकतेच मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सानंदा देखील लवकरच पक्ष बदलतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. काही महिनेपूर्वी त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यावरही अशाच चर्चा सुरू झाल्या होत्या.
सानंदा नाराज का?
सानंदा स्वतः काँग्रेस सोडण्याच्या शक्यतेस नकार देत असले तरी, जिल्ह्यात सध्या त्यांची एकप्रकारे उपेक्षा होत असल्याचे चित्र आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी आमदार राहुल बोंद्रे यांचेच वर्चस्व जिल्ह्यात दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी राहुल गांधी यांच्या दौऱ्यावेळी सानंदा समर्थकांनी कार्यक्रमात अडथळा आणल्याचा आरोपही झाला होता.
बुलडाण्यात काँग्रेसची परंपरागत लढत ही भाजपच्या फुंडकर घराण्याशी राहिली आहे. सध्या आकाश फुंडकर मंत्री झाल्याने ते जिल्ह्यात विकासकामांवर भर देत आहेत. त्यामुळे सानंदा यांना अजित पवारांच्या गोटात अधिक वाव मिळेल का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
सपकाळ यांचं अध्यक्षपद आणि काँग्रेसमधली पडझड
हार्षवर्धन सपकाळ यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या नियुक्तीनंतर जिल्ह्यात काँग्रेसमधून पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्या नियुक्तीच्या काहीच दिवसांत विजय अंभोरे यांनी काँग्रेसचा निरोप घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ॲड. गणेशसिंग राजपूत यांनीही शिंदे गटात प्रवेश केला.
या सर्व घडामोडी पाहता, जिल्ह्याच्या राजकारणात सध्या प्रचंड अस्थिरता आहे. दिलीप सानंदा काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं आणि राज्याच्या काँग्रेस नेतृत्वाचं लक्ष लागलेलं आहे.