जलसंकटामुळे १२ वर्षीय मुलीचा मृत्यू;जिल्हानिहाय योजना तयार करून समस्येचे समाधान शोधू,मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया !

    19-Apr-2025
Total Views |

CM Devendra Fadnavis
(Image Source : Internet) 
नाशिक:
यवतमाळ जिल्ह्यात पाण्याअभावी १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, “जलसंकट लक्षात घेऊन आम्ही प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र योजना तयार केली आहे. ज्या भागांमध्ये पाण्याची टंचाई आहे, तेथे टँकर किंवा अन्य उपलब्ध साधनांद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यायचा आहे. यासोबतच या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.”
 
शनिवारी नाशिक दौऱ्यावर आले असताना पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना यवतमाळमधील या दुर्दैवी घटनेविषयी विचारले. त्यावर बोलताना ते म्हणाले, “जिथे पाण्याची कमतरता आहे, तिथे जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार दिले आहेत. ते ठरवतील की त्या भागात टँकरने पाणीपुरवठा करायचा की इतर कोणत्या माध्यमातून.”
 
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, “एप्रिल आणि मे महिन्यांत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जलसंकट निर्माण होते. त्यामुळे आम्ही प्रत्येक जिल्ह्यासाठी जलसंकट योजनेचे नियोजन करतो. ज्या भागांमध्ये कमी आहे, तिथे त्या योजनांनुसार उपाययोजना राबवण्यात येतात. जिल्हाधिकाऱ्यांना त्यासाठी निधीही दिला जातो. त्यामुळे अशा घटना घडल्यास आम्ही त्याचा गंभीरतेने अभ्यास करून समस्येचे मूळ समजून त्यावर उपाय शोधू.”
 
या घटनेची पार्श्वभूमी सांगताना, ज्या गावात ही दुर्दैवी घटना घडली तिथे केंद्र सरकारच्या ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत ‘हर घर नल’ योजना लागू करण्यात आली आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, माझ्याकडे या विशिष्ट घटनेची सविस्तर माहिती नाही, आणि यानंतर काय झाले याचीही माहिती नाही. त्यामुळे मी या विषयावर सध्या अधिक बोलू शकत नाही.