
(Image Source : Internet)
नागपूर :
माजी मंत्री आणि विद्वान नेते डॉ. श्रीकांत जिचकर यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकर (Yagyavalkya Jichkar) यांनी गुरुवारी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. मुंबईतील तिळक भवन येथे आयोजित कार्यक्रमात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल यांच्या उपस्थितीत त्यांचा औपचारिक पक्षप्रवेश करण्यात आला.
गेल्या विधानसभा निवडणुकीत याज्ञवल्क्य जिचकर यांनी काटोल मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली होती. या निर्णयानंतर काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. आता पुन्हा पक्षात त्यांच्या पुनरागमनामुळे स्थानिक राजकारणात नव्याने घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
सध्या याज्ञवल्क्य जिचकर हे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव म्हणून कार्यरत आहेत. काटोल मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला मानला जातो. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या पुत्राने – सलिल देशमुख यांनी या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.
सद्भावना यात्रेत सक्रीय सहभाग-
काँग्रेसने नुकतीच नागपूरमध्ये आयोजित केलेल्या सद्भावना यात्रेत याज्ञवल्क्य जिचकर यांनी सक्रीय सहभाग नोंदवला होता. त्यांच्या सहभागामुळेच त्यांच्या काँग्रेसमधील पुनरागमनाच्या चर्चा जोर धरत होत्या, ज्यावर आज अधिकृत शिक्कामोर्तब झाले.